यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणल्यानंतर तब्बल अर्ध्या शतकानंतर राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजर्षींचा पुतळा संसदेसमोर बसविण्याची घोषणा केली. त्यानंतर तो आता विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात संसदेच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात विराजमान होत आहे. राजर्षींचा त्यांच्या
देहावसना
नंतर तब्बल आठ दशकांनंतर दिल्ली दरबारी जणू दुसरा राज्यअभिषेकच होत आहे. पण एक सत्य आहे की, आजकालच्या राज्यकर्त्यांच्या भाषणांची सुरूवात ज्या फुले-शाहू- आंबेडकर या प्रातःस्मरणीय त्रयींशिवाय पुर्ण होत नाही त्या तिघांच्याही वाट्याला तशी उपेक्षाच आली. यातील महात्मा जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुलनेने थोडे नशीबवान ठरले पण राजर्षींना थोडी जास्तच प्रतिक्षा करावी लागली. खरेतर या तिघांच्याही कार्याचे तेज इतके प्रचंड आहे की त्यापुढे हजारो सुर्यांचे तेजही फिके पडेल. पण एकतर आमच्या राज्यकर्त्यांचे डोळे या तेजामुळे दिपले असतील किंवा त्यांची स्मृती फारच क्षीण असावी कारण सामाजीक समतेचे आगळेवेगळे उदाहरण प्रस्थापित कऱणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा संसदेच्या प्रांगणात बसण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर थेट २००९ उजाडले. असो देर आए दुरूस्त आए या न्यायाने उशीराने का होईना पण अखेर त्यांचा पुतळा लोकशाहीचा महाकुंभ जेथे भरतो त्या संसदेत बसत आहे. राजर्षींचा पुतळा संसदेत बसविल्यानंतरच त्यांच्या कार्याची ओळख जगाला होणार आहे किंवा त्याला 'चार चाँद' लागणार आहेत असे मुळीच नाही. यामुळे लोकप्रतिनिधी आणि लालफितीशाही अंगवळणी पडलेले अधिकारी एका क्षणात माणसात येतील असेही नाही. पण महापुरूषांचे पुतळे त्यांची छोटी स्मारकेच असतात. हे स्मारक देशातील सर्वोच्च संस्थेच्या समोर उभे राहणार आहे. त्यामुळे ते सातत्याने त्यांच्या दृष्टीसमोर राहिल्यास किमान अंशतः का होईना या लोकांच्या मनात थोडा धाक राहील हे नक्की...सभागृहात विनाकारण गदारोळ करणारे, जनतेच्या जीवावर निवडून येऊन त्यांच्याच पैशाचा अपव्यय करणारे या सर्वांवर राजर्षींची करडी नजर राहणार आहे. राजर्षींनी उभ्या आयुष्यात जोपासलेले रयतेच्या कल्याणाचे सुत्र, लोककल्याणाची कळकळ आणि त्याहीपेक्षा
तत्का
लिन सामाजीक व्यवस्थेच्या चक्रव्यूव्हाला भेदण्याची दाखविलेली हिंमत जितकी अफाट तितकीच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची झळाळीही लोकविलक्षण आहे. एक राजा, समाजसुधारक, एक शिक्षणतज्ज्ञ, समतावादी, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता, समाजशास्त्रज्ञ असे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविता येतील. केवळ अस्पृश्यता निवारण आणि शिक्षणाचा प्रसार या दोनच मापदंडात महाराजांचे कार्य जोखणे ही सर्वात मोठी घोडचूक ठरेल. धर्ममार्तंडांना सणसणीत चपराक देत त्यांनी शतकांनुशतके दाबलेल्या, अज्ञानाच्या काळ्या कोठडीत डांबलेल्या आणि एकंदरीतच जगण्याचा अधिकार नाकारलेल्या कोट्यवधी जनतेला राजर्षींनी एक स्वप्न दाखविले. हे स्वप्न मुक्त आकाशाचे होते. ज्ञानसूर्याला कवेत घेण्याचे होते, प्रस्थापित व्यवस्थेला भेदून नवा समाज घडविण्याचे होते. एवढे सामर्थ्य असणारे विशाल स्वप्न दबलेल्या पिचलेल्या जनतेला दाखविणारा हा द्रष्टा राज्यकर्ता त्यांच्या स्वप्नांसाठी स्वतः पहाडासारखा आलेल्या संकटांना सामोरा गेला. हरेक संकट त्याने आपल्या पोलादी छातीवर झेलले. जोपर्यंत दबलेली जनता आपल्या संघर्षासाठी तयार होत नाही तोपर्यंत त्याने या उभ्या लढ्याचे नेतृत्त्व केले . त्यानंतर कसलाही गाजावाजा न करता या लढ्याचे नेतृत्त्व पुढच्या पिढ्यांकडे सोपवून हा राजा काळाच्या पडद्याआडही गेला. पण या महान राजाच्या कर्तृत्वाची झळाळीच एवढी की, आज धर्ममार्तंडाचे सर्व बुरूज ढासळले आहेत. त्यांच्या बालेकिल्ल्यावर समतेची पताका अभिमानाने उभी आहे. महाराज हय़ात असतानाचा काळ इंग्रजांच्या अंमलातील होता. सर्व सत्ता ब्रिटीशांकडे एकवटलेली होती. मात्र त्यामुळे राजर्षींच्या प्रयत्नांना मर्यादा पडल्या असे मात्र मुळीच नाही. प्रसंगी आप्तेष्टांचाही रोष पत्करून त्यांनी रयतेच्या हिताची कामे केली. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी ज्यांच्या विचारांवर झाली. त्यांत राजर्षींचे नाव अग्रस्थानी आहे ते यामुळेच.... महाराजांच्या संस्थानातून एकापेक्षा एक विचारवंत, लेखक, कलावंत, तंत्रज्ञ बाहेर पडले. यामागे महाराजांच्या विचारांचे बळ होते हे सांगण्यासाठी कुण्या होराभूषणाची गरज नाहीच. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या मातीला महाराजांचा उदय होण्यापुर्वी केवळ 'जी हुजूरी' कऱण्याची सवय होती. पण महाराजांच्या वास्तव्याचा पुनितस्पर्श झाल्यानंतर या मातीचा स्वाभिमान जागा झाला. ताठ मानेने जगाला कसे सामोरे जावे हे राजर्षींनी येथिल लोकांना शिकविले. शिक्षण आणि केवळ शिक्षणच दबलेल्या-पिचलेल्या घटकाचा तारणहार आहे हे महाराजांनी या लोकांना ठसविले. यामुळेच कोल्हापूरच्या पट्ट्यातील अनेक दलित तरूणांनी त्यानंतरच्या काळात आपल्या कर्तृत्त्वाची छाप उमटविली. विशेष म्हणजे त्यांच्या उत्कर्षामुळे जळफळाट होणाऱ्या मंडळीची संख्या यानंतरच्या काळात अगदी नगण्य होती हे देखील राजर्षी शाहू महाराजांच्याच शिकवणूकीचेच यश.... राखीव जागांच्या मु्द्यावर आजकाल सर्वत्र काहूर माजले आहे. पण महाराजांनी आपल्या संस्थानात सर्वप्रथम दलित आणि आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या लोकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देऊन एक नवा विचार त्याकाळच्या जनतेला दिला. यामुळे झालेली मानहानी, टीका त्यांनी सहन केली. त्यांच्या काळात एकीकडे बहुतेक संस्थानिक सत्तेच्या मदात, इंग्रजांचे मांडलिक होऊन रयेतेवर जुलूम करण्यात धन्यता मानत त्याचवेळी दुसरीकडे हा राजा रयतेच्या हितासाठी अहोरात्र तत्पर होता. या राजाचे कार्य इतके महान की, त्याच्या राज्याला 'रामराज्या'ची नाही केवळ 'शाहूराज्याची'च उपमा जास्त चपखल बसते. कारण त्याच्या राज्यात कुठल्याही शंबुकाचा शिरच्छेद झाला नाही उलट लक्षावधी शंबुकांना मुख्य प्रवाहात आणले गेले. धर्ममार्तंडाचे स्तोम लाडावून न ठेवता त्यांना त्यांच्या मर्यादेत रहा अशी जरब बसविणारा राज्यकर्ता केवळ राजर्षी शाहू हाच होता हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मंडल आयोगाच्या अहवालाने देशभर काहूर माजविले होते. देशाच्या कानाकोपऱ्यात सामाजीक आणि आर्थिक विषमतेने कंबरडे मोडलेला एक मोठा वर्ग आहे. त्याला उत्थानासाठी मदतीची गरज आहे. ती मोठी मदत मंडलच्या माध्यमातून होणार होती. मात्र मंडलपेक्षा कमंडलवर भरवसा ठेवणाऱ्या शक्तींनी याला विरोध करीत आपल्या क्षुद्र बुद्धीचे हिणकस प्रदर्शन घडविले. या सर्वांनी राजर्षींच्या चरीत्राचे पारायण केले असते तरी कदाचित थोडाफार फरक पडला असता. समाजातील एक मोठा वर्ग आजही मतदारयाद्या, लोकशाही, मूलभूत सुविधा यांच्यापासून हजारो प्रकाशवर्षे दूर आहे. या सर्वांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या रेणके आयोगाच्या शिफारशी केंद्राकडे विचाराधीन आहेत. आपला संसार पाठीवर टाकून अन्नाच्या शोधार्थ देशोदेशी भ्रमण करणारा हा मोठा वर्ग आजही सर्व सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. संसदेच्या प्रांगणातील राजर्षींच्या स्मारकाची प्रेरणा घेऊन राज्यकर्ते कदाचित या अहवालाच्या शिफारशी स्वीकारतील आणि त्या वास्तवात येतील असा विश्वास ठेवण्यास हरकत नाही. फुलांच्या संगतीने मातीलाही गंध लागतो या उक्तीनुसार कमंडलचे राजकारण करणाऱ्या आधुनिक शुक्राचार्यांनाही राजर्षींच्या कार्याची महानता लक्षात येईल अशीही आशा करण्यास हरकत नाही. राजकारण हा सत्ता संपादन करण्यासाठी खेळला जाणारा मोठा खेळ आहे. पण मोठ्यांच्या खेळात कुणी सामान्य भरडला जाऊ नये कुणाचे अकल्याण होऊ नये. राजकारणाची नैतिकता कायम रहावी. यामुळे लोकशाहीची बुज राखली जाणार आहे. राजर्षींच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी अशा माफक अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही. राजर्षींचीही हिच इच्छा असेल. ------------------------------------------समाप्त---------------------------------------
No comments:
Post a Comment