Friday, 6 March 2009
ऐन थंडीत हवा तापली....
लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू होण्यापुर्वीच निवडणूक आयोगामध्ये दुदुंभी वाजू लागली. मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी त्यांचे सहकारी नवीन चावला यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. भारतीय जनता पार्टीने सातत्याने चालविलेल्या मोहिमेचा परिपाक म्हणून गोपालस्वामी यांनी ही शिफारस केल्याचे समजते. गोपालस्वामी यांनी घटनात्मक चौकटीत राहूनच हा निर्णय घेतला मात्र त्यांचे टायमिंग चुकले. आणि त्यांच्यावर सार्वत्रिक टीका झाली. सरकारनेही मग वाहत्या गंगेत हात धुऊन घेत पुढचे निवडणूक आयुक्त नवीन चावलाच असतील असे स्पष्ट केले. सरकारच्या निर्णयामागे सत्ताधारी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष काँग्रेसमधील धुरीणांचा हात आहे हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणिबाणी लादली या एकाच भांडवलावर अनेक वर्षे तगलेले अनेक पक्ष देशातील जनतेने पाहिले. त्यातीलच एक म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा पुर्वीश्रमीचा जनसंघ.... आणिबाणीच्या काळात अर्ध्या चड्डीत असणारे कार्यकर्ते आता फुलपॅण्टमध्ये आले असले तरी अजूनही त्यांना आणिबाणीच्या काळातील आंदोलनाने उत्साहाचे भरते येते. या लोकांचा त्या काळातील नोकरशहांवर राग आहे. तो नेहमीच या ना त्या कारणाने बाहेर येत असतो. नवीन चावला अशाच प्रकारच्या जुन्या आकसाचे बळी ठरले असावेत. चावला यांनी आणिबाणीच्या काळात कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय केला असा या लोकांचा आरोप आहे. या आरोपांमध्ये तथ्य किती हा संशोधनाचा विषय ठरू शकतो पण सध्या तरी गोपालस्वामींच्या लीलांनी भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिकडे, नागपूरात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणिच्या बैठकीत भाजपने आपला भगवा कार्यक्रम जाहीर करित पुन्हा एकदा अयोध्येतील रामाला साकडे घातले आहे. अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी सत्तेत आल्यास कायदा करण्याचा मनसुबा पक्षाने जाहीर केला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसारखा करीश्मा पक्षाच्या सोबत नाही. त्यातच लालकृष्ण अडवाणींसारख्या संघपरिवारात फारशा प्रिय नसणाऱ्या नेत्याला पंतप्रधानपदासाठी पुढे केल्यामुळे अगोदरच भाजपची गोची झाली आहे. त्यामुळे अधुनमधून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि राजस्थान भाजपचे पितामह भैरोसिंह शेखावत यांची पंतप्रधानसाठी इच्छुक असणारी आवई उठत आहे. पार्टी विथ डिफरन्स असा नारा देणाऱ्या भाजपमध्येही आता इतरांपेक्षा वेगळे असे काही राहिले नाही याचाच हा संकेत...... ज्या राममंदिराच्या मुद्यावर देशात रणकंदन झाले.... ज्या मुद्यावर जनतेने भाजपला सत्ताकारणात केंद्रस्थानी आणले तोच मुद्दा आता कालबाह्य होऊ लागला. सौम्य हिंदुत्त्वाची भाषा करणारे राजकारणी सत्तेच्या लढाईत पुढे आले. हा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी सोपा असला तरी तो तितका व्यवहार्य नाही याची पुरेपूर जाण भाजपच्या नेत्यांना आहे. पण तरीही भावनिक राजकारणाची नस पुरती ओळखलेल्या संघपरिवार आणि त्यांच्या इतर संघटनांसाठी आजही या मुद्याचे पुरेपूर आकर्षण आहे. त्यामुळेच भाजपतील एका मोठ्या गटाला नको असतानाही राममंदिराचा राग पुन्हा एकदा आळवावा लागत आहे. दिल्लीची गादी मिळविण्यासाठीच्या शर्यतीत भाजपने घेतलेला यू टर्न अनपेक्षित नसला तरी त्याची गती किती असणार यावर या शर्यतीचे यशापयश अवलंबून आहे. दुसरीकडे, राज्यातील सहकारी शिवसेना साथ सोडण्याची धमकी देत आहे. यामुळे तर राज्य भाजपमध्ये काय सुरू आहे. किंबहुना प्रादेशिक नेतृत्त्व आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय आहे का हा संभ्रम आहे. राज्य भाजपतील ताकदवान नेते गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे आणि हरिभाऊ राठोड यांच्यात साम्य काय असा प्रश्न विचारला तर त्याचे एक उत्तर कुणीही देईल ते म्हणजे एकेकाळी हे सर्वजण भाजपचे ताकदवान नेते होते. ( यातील मुंडे अजूनही पक्षात आहेत ) सरसंघचालकांच्या आदेशावरून महाराष्ट्रात संघाच्या मुशीतील सोशल इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्ट राबविणाऱ्या वसंतराव आपटेंच्या नजरेने टिपलेल्या काही चुणचुणीत बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची एक मोठी फळी एकेकाळी महाराष्ट्र भाजपमध्ये कार्यरत होती. गोपीनाथ मुंडे आणि अण्णा डांगे ही त्याची प्रातिनिधीक उदाहरणे.... पुढे तर शिवसेनेसोबत सत्ता संपादन केल्यावर गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झाले. मात्र नंतरच्या काळात विशेषतः प्रमोद महाजनांच्या मृत्यनंतर त्यांच्यावर अस्तित्त्व दाखविण्यासाठी बंड करण्याची वेळ आली. त्यांचा लोकमानसावर अजूनही पगडा असल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्याची हिंमत केंद्रीय नेतृत्त्वात नव्हती. पण पक्षात या तडफदार नेत्याची घुसमट होतेय हे लपून राहिले नाही हे विशेष महत्त्वाचे..... पण अण्णा डांगे यांना मात्र हे भाग्य लाभले नाही. एकेकाळी बहरात असणारे हे नेतृत्त्व जवळपास विस्मृतीत जाते की काय अशी भीती निर्माण झाली . प्रादेशिक पातळीवर हि स्थिती तर केंद्रीय पातळीवरही कल्याणसिंह, उमा भारती आणि गोविंदाचार्य या बहुजन समाजातील नेत्यांना भाजप सोडावी लागल्याची उदाहरणे आहे. कालपरवाच जातियतेचा शिक्का लावत गेली दहा वर्षे वागविलेली भाजपची कफनी यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उतरविली. विशिष्ट समाजातील नेत्यांवरच हि वेळ का आली याचे परिक्षण भाजप करणार का हा वेगळा विषय आहे. मात्र हरिभाऊंच्या काँग्रेस प्रवेशानंतर हा प्रश्न उपस्थित झाला हे निश्चित. तिकडे काँग्रेसला मात्र आयते कोलित मिळाले आहे. गेल्या वर्षी विश्वासदर्शक मतदानाला अनुपस्थित राहिल्याचे बक्षीस राठोड यांनी मिळाले. त्यांना लोकसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविण्यापुर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आजारी असल्यामुळे काँग्रेसश्रेष्ठी यावेळी पंतप्रधानपदासाठी कुणाचे नाव पुढे करणार याबाबत उत्सुकता होती. गेल्या काही महिन्यांपासून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नेहमीच पुढे सरसारवणाऱ्या प्रणबदांचे नाव सर्वात पुढे असू शकेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसश्रेष्ठींनी पुन्हा एकदा मनमोहनसिंग यांच्यावर विश्वास ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशींग बांधून बसलेल्या इतर इच्छुकांची सरळसरळ गोची झाली आहे. अर्थात याबाबत कुणी उघड नाराजी व्यक्त केली नसली तरी धुसफूस आहे हे मात्र नक्की..... पण सध्याची स्थिती पाहता नेतृत्त्वाच्या विरोधात शक्यतो कुणी बंड पुकारणार नाही अशी लक्षणे आहेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment