
विजयसिंह भोसले यांचे निधन झाल्याचे समजताच नियतीकडून झालेल्या एका मोठ्या पराजयाची जाणीव झाली. आयुष्यभर परिस्थितीशी झगडणा-या एका सुस्वभावी मित्राची अखेरही साक्षात यमराजाशी झगडताना व्हावी यासारखा दुसरा योगायोग कोणता असेल. फरक इतकाच आतापर्यंत जवळपास प्रत्येक लढाई जिंकलेला हा माणूस यमराजाला हरवू शकला नाही. कुटूंबिय, मित्रपरिवारांच्याच काय पण हातात अक्कलकोट स्वामींचा फोटो घेऊन आयसीय़ूच्या बाहेर उभारलेल्या सुमित्राताईंच्याही प्रार्थना फळाला आल्या नाहीत.
उरूळी कांचनमध्ये त्यांना एका अज्ञात वाहनाने उडविल्याची खबर मिळताच हडपसर येथील नोबेल हॉस्पीटलमध्ये त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणा-यांची अक्षरशः रीघ लागली. खासदार, आमदार, नगरसेवक, संपादक, पत्रकार तर त्यांमध्ये होतेच पण त्याहीपेक्षा त्यांच्या काळजीने आलेला खुप मोठा मित्रपरिवार नोबल हॉस्पीटलमध्ये जमला होता.काय होता हा माणूस ? एका खासदाराचा पी.ए. ही त्यांची ओळख पुरेशी आहे. पण एका खासदाराचा पी.ए. आपल्या मृदू स्वभावाने इतकी माणसं जोडतो कशी किंवा माणसं कशी जोडावीत याचे तो मूर्तीमंत उदाहरण असतो हीच बाब विजयरावांची वेगळी ओळख अधोरेखीत करणारी बाब आहे.
माझा आणि त्यांचा संबंध दोन वर्षांपेक्षाही कमी काळाचा.... पण फार थोड्या काळात आम्ही खुपच जवळ आलो. पहिल्याच भेटीत आमचे सूर जुळले. आम्ही तासन् तास विविध विषयांवर गप्पा मारत असू. त्यातून मग काही नव्या कल्पनांचा जन्म होई आणि त्याच्या पुर्ततेसाठी विजयदादांची धावपळ सुरू होई. अनेकदा दादा हे सर्व कशासाठी करताय. आपली नोकरी करा ना गुपचूप असे रागावून सांगण्याची वेळ यायची पण त्यावेळी अतिशय शांतपणे हसून हा माणूस त्या कामात मलाही कधी सोबत घेत असे हे माझे मलाच कळायचे नाही. त्यांच्या बोलण्यात अनेकदा एकटेपणाची जाणीव डोकावून जात असे पण ती क्षणभरच असे. ते नेहमी आपली मुले, पत्नी आणि आईबद्दल भरभरून बोलत असत. पण त्यांचा संसार फक्त एवढाच नव्हता. मुले, पत्नी आणि आई याहीपेक्षा खरेतर त्यांचा संसार खुप मोठा होता. त्या संसारातील ते आमचे वैचारिक पोशींदे होते.

एक दिवस भोसलेसाहेबांनी त्यांचा मोबाईल माझ्याकडे दिला त्याचवेळी त्यावर एक गॉडफादर नावाचा फोन आला. मी विचारले दादा, हा फोन कुणाचा ? त्यावर ते उत्तरले दादा, हा फोन रणजितदादांचा.... विजयसिंह भोसले हे मा.खा. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक, रणजीतदादा आणि भोसलेसाहेब यांचे नाते लौकीकअर्थाने मालक-नोकर असे होते. पण ते दोघे त्याहून अधिक चांगले मित्र होते.भोसलेसाहेब कधीकधी दादांना अशा पद्धतीने काही गोष्टी ऐकवित ( त्या फक्त खासगीत ) की, दादा कधीकधी त्यांच्यावर प्रचंड नाराज होत. दोन-तीन वेळा तर दादांनी त्यांना कामावर येऊ नकोस असे सुनावलेही असेल. पण विजयदादांनी दिलेले उत्तरही तितकेच बाणेदारपणाचे असायचे. ते म्हणत, दादा मी तुमचे मीठ खातो. त्यामुळे तुम्ही कुठे चुकत असाल तर तुम्हाला परखडपणे सांगणे माझे कर्तव्य आहे. विजयरावांच्या याच गुणामुळे रणजीतदादांनी त्यांना आपल्यापासून कधीच दूर केले नाही. त्यांचा अपघात झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत मोहिते-पाटील यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रकृतीचे अपडेट घेत होती. डॉक्टरांना व्यक्तीशः भेटत होती.
एनआरव्ही मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सदोदित काम करणारा हा माणूस.. त्याच्याकडे एवढी क्षमता कुठून आली होती कुणास टाऊक पण लहानपणासून मिळालेल्या घावांनी विजयसिंह भोसले या माणसाची एक सुंदर मुर्ती तयार झाली होती. उरूळी-कांचनमध्ये एखादे काम झाले किंवा त्याची कल्पना सुचली की, त्याचा एक एसएमएस किंवा इमेल पाठवून आनंद व्यक्त करणारा हा माणूस आता परत दिसणार नाही. अधिवेशनाच्या काळात राज्यसभेच्या बाहेर शांतपणे बसलेली ( नव्हे उभारलेली ) त्यांची मुद्रा अजूनही माझ्या डोळ्यासमोर तरळतेय. आता २६ जुलैपासून संसदेचे सत्र सुरू होतेय. मी प्रयत्न करतोय की राज्यसभेच्या बाहेरील सज्जातून जाताना माझा बांध फुटू नये याचा पण रणजीतदादा एकटेच दिसतील तेंव्हा मी माझ्या अश्रूंना रोखू शकणार नाही.... खरेतर शब्द सुचत नाहीत. कारण इथे समोरच टेबलावर त्यांची आपल्या हाताने जरा विचार करा असे लिहिलेले स्टीकर आहे जे त्यांनीच आपल्या हाताने अगदी आग्रहपूर्वक आणून चिकटवलेले आहे. डोळ्यांत अश्रूंची गर्दी झालीय. दादा, तुम्ही इतके अचानक कसे काय गेलात हो ? दिल्लीत येताना-जाताना किंवा घरातून बाहेर पडताना तुमचा एक एसएमएस माझ्याकडे आलेला असे. तुम्ही एवढ्या मोठ्या प्रवासाला निघून गेलात तेही अचानक आणि न सांगता. धीस इत नॉट फेअर दादा.....
No comments:
Post a Comment