Friday, 19 February 2010


छत्रपती शिवाजी महाराज.... शतके उलटली पण या नावाची जादू आजही इतकी जबरदस्त आहे की, या नावाचा जयघोष होताच तरूणांचे बाहू आजही स्फुरण पावतात. मुठी आवळल्या जातात आणि छाती अभिमानाने भरून येते. वीररसाचे मुर्तीमंत उदाहरण यापेक्षा ते वेगळे काय असू शकेल. अवघे त्रेपन्न वर्षांचे आयुष्य पण तेही एवढे चमत्कृतींनी भरलेले की, कुणाचाही विश्वास बसणे अशक्य. ज्या वयात मुलांनी विटीदांडूचे खेळ खेळायचे त्या वयात शिवाजीराजांनी उजाड झालेल्या पुण्यामध्ये सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली. ओठावर मिसरूड फुटण्यापुर्वी त्यांनी तोरणा किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले. ज्या वयात स्वतःच्या घराच्या चतुःसीमाही माहित नसतात त्या वयात शिवरायांनी स्वराज्याचा नुसता संकल्पच सोडला नाही तर तोरणा ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढही रोवली.
देवगिरीच्या हिंदू साम्राज्याचे पतन केल्यानंतर स्थापन झालेल्या पाच शाह्यांनी म्हणजे बरीदशाही, आदिलशाही, निजामशाही व कुतुबशाही यांनी मराठी मुलूख अक्षरशः आपल्या दावणीला बांधला होता. त्यात मोगलांनीही मराठी मुलूखातील सरदारांना आपल्याकडे वळवून घेण्याचा सपाटा लावला होता. थोडक्यात मराठी मातीवर सांडलेले रक्त मराठ्यांचे आणि सांडणारेही मराठे पण मालकी मात्र दुस-याची असी चमत्कारिक स्थिती होती. काहीजणांनी याच उद्वेगातून शिवाजी महाराजांनी हिंदूंचे राज्य स्थापन करण्याची उर्मी बाळगली असा सिद्धांत मांडतात. माझ्या मते महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडताना केवळ हिंदू राज्याचा विचार डोळ्यासमोर ठेवला नाही कारण महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेत केवळ हिंदूच नव्हते तर मुस्लीमही होते. साधू आणि फकिर या दोघांनाही एकाच तागड्यात जोखणा-या शिवरायांनी आपल्या लढ्यात अठरापगड जातीच्या लोकांना सहभागी करून घेतले. हे होते हेटकरी, तराळ, कुणबी अशा समाजाच्या अंतीम तळातील लोक. रांगेतील शेवटच्या माणसाला महाराजांनी हातात तलवार देऊन स्वाभिमानाने जगणे शिकविले. आपल्या घराला आगी लावणारे हात कलम करण्याची शिकवण महाराजांनी दिलीच शिवाय आपल्या घराला सुखी, समृद्ध आणि संस्कारी कसे करायचे हा मुलमंत्रही दिला.
मला वाटते महाराजांनी दिलेला स्वराज्याचा विचार हा केवळ हिंदू राज्याचा किंवा कुठल्या साम्राजाचा विचार नव्हता. हा विचार होता तळातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा. महाराजांनी शेवटच्या रांगेतील माणसाचा विचार डोक्यात घेऊन स्वराज्याचे शिपाई घडविले. त्यांच्या फौजेत सहभागी झालेल्यांमध्ये शेतकरी, कष्टकरी, गाव कामगार अशा विविध समाजघटकांचा उत्स्फुर्त सहभाग होता. त्यामुळे स्वराज्याच्या लढ्यामध्ये पहिल्या साम्यवादी क्रांतीची बीजे दडली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ज्यांच्यामधून कधी विस्तव जात नव्हत्या अशा मराठे सरदारांना, मनसबदारांना राजांनी एका सुत्रात बांधले. स्वराज्याचा विचार दिला. जे आले त्यांचे सोने झाले आणि जे आले नाहीत त्यांना चंद्रराव मो-यांच्या मार्गाने पाठविण्यात आले. महाराजांनी ज्या पद्धतीने लढाया केल्या त्या प्रत्येक लढाईत त्यांनी केवळ जिंकण्यासाठी लढणारा मर्द मराठा निर्माण केला. मला वाटते केवळ महाराष्ट्रावरच नाही तर समग्र विश्वावर महाराजांचे ऋण आहेत. शून्यातून विश्व घडविणा-या या महामानवाला कोटी कोटी नमन.......

No comments:

Post a Comment